संभाजीनगर, दि.२_ संभाजीनगर एस टी डेपोवर मालेगावला जाणाऱ्या महिलेच्या छातीत दुखत अचानक प्रकृती खालावल्याने डेपो वरील महिला कंडक्टरने त्या महिलेला ताबडतोब सीपीआर दिल्याने तिचा जीव वाचला.
‘ सरकारी काम आणि बारा महिने थांब ‘ या म्हणीप्रमाणे देशातील बहुतेकांना अनुभव तर नक्कीच आला असेल. पण, काही जण आपल्या संवेदनशीलता दाखवत आपले कर्तव्य प्रमाणिकपणे बजावत आहेत. मानवतेचे दर्शन घडवणारी अशीच एक घटना छत्रपती संभाजीनगर एस टी डेपोवर घडली आहे. मालेगावला जाणारे अरुणा सुनील जैन यांना अचानक छातीत तीव्र वेदना सुरू झाल्या. वेदनेमुळे त्यांची अस्वस्थ झाल्याचे काही प्रवाशांच्या लक्षात आले. प्रवाशांची गर्दी पाहता कंडक्टर संगीता पालवे यांनी त्या दिशेने धाव घेतली. अरुणा यांची अवस्था पाहता कंडक्टर संगीता यांनी तातडीने अरुणा यांना सीपीआर देण्यास सुरुवात केली. सीपीआर मिळाल्यामुळे अरुणा यांचे छातीचे ठोके सुरू राहिले. यादरम्यान वैद्यकीय मदतीसाठी रुग्णवाहिकेला संपर्क करण्यात आला. मात्र वेळेत मदत न मिळाल्याने कर्मचाऱ्यांनी तत्काळ महिलेले रिक्षातून घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तातडीने महिलेवर उपचार केल्यामुळे महिलेचा जीव वाचला. प्रसंगावधान दाखवत केलेल्या कृतीमुळे एका महिला प्रवाशाचा जीव वाचला. कंडक्टर संगीता पालवे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.






